रत्नागिरी : आर्ट सर्कल आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे रत्नागिरीत होणार असलेल्या ‘पुलोत्सवा’मध्ये ‘पुलकित रेषा’ हे व्यंगचित्र प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यातील व्यक्तिरेखा विविध चित्रकारांच्या कुंचल्याच्या माध्यमातून त्या वेळी रसिकांना अनुभवता येणार आहेत. ‘चिंटू’ या लोकप्रिय पात्राची निर्मिती करणारे ज्येष्ठ चित्रकार चारुहास पंडित यांच्या हस्ते सात डिसेंबर २०१८ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. नऊ डिसेंबरपर्यंत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले असणार आहे.
या प्रदर्शनात विविध चित्रकारांनी काढलेली ७५ व्यंगचित्रे पाहता येणार आहेत. कलांमधील सौंदर्य शोधणारे आणि ते उलगडून दाखवणारे आनंदयात्री म्हणजे ‘पुलं’. म्हणूनच या ‘पुलोत्सवा’त विविध कलांचा जागर होणार आहे. आठ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सावरकर नाट्यगृहात चारुहास पंडित यांची मुलाखत होणार असून, मुलाखतीतून पंडित व्यंगचित्राचे माध्यम उलगडून दाखवणार आहेत. चिंटू हा चारुहास पंडित यांचा मानसपुत्र! वृत्तपत्रातून भेटीला येणारी चिंटू, मिनी, राजू, बगळ्या ही पात्रे सलग २१ वर्ष आबालवृद्धांच्या मनात स्थान मिळवून आहेत. चित्रपट, अॅनिमेशन या माध्यमांतूनही चिंटू रसिकांच्या भेटीला आला.
या वेळी व्यंगचित्र कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. ही कार्यशाळा मोफत असून, चित्रकलेच्या विश्वातील एक नवीन दार या कार्यशाळेच्या निमित्ताने मुलांना आणि मोठ्यांनाही खुले होणार आहे. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी वयाची अट नाही. यात जास्तीत जास्त जणांनी सहभागी व्हावे, असे आवाहन ‘आर्ट सर्कल’तर्फे करण्यात आले आहे.